२६ ऑगस्ट रोजी जश्ने ईदे मीलादुन्नबी (स.) च्या जुलूस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्म दिवस
सालाबादप्रमाणे यावर्षीही जश्ने ईदेमिलादुन्नबी (स.) उत्साहाच्या वातावरणात सुन्नी मुस्लिम जमात चिपळूण यांचे तर्फे बुधवार दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले असून यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सुन्नी मर्कज सुन्नी शाही तकिया मस्जिद या इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मस्जिदीसमोरील बाजारपुल व परिसर येथे ही विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्त दुपारी ठीक ३.०० वाजता जुलूस मोहम्मदिया (आनंद फेरी) आफ्रिन पार्क, गोवळकोट रोड येथून निघणार असून ती गोवळकोट रोड, बायपास रोड कमानी पर्यंत जाऊन पुन्हा गोवळकोट मार्गे हॉटेल अलिशानकडून बाजारपुल व भेंडीनाका करून रंगोबा साळवे मार्गे शिवनदी जवळ सय्यद मुराद दर्गा समोरून वडनाका मार्गे शिवाजी चौक (चिंचनाका) बाजारपेठ मार्गे सुन्नी मर्कज सुन्नी शाही तकिया मस्जिद बाजारपुल येथे सांगता होऊन मस्जिदीमध्ये असर ची नमाज अदा केली जाईल व लगेच मगरिबची नमाज अदा करून मस्जिदीमध्ये जलश्याचे (कार्यक्रमाचे) आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी नात (पैगंबराचे गुण गौरवगाणे) व उलमांचे पैगंबरांच्या जीवनावर बयान (प्रवचन) होईल. शेवटी सलातो सलाम व दुआ त्यानंतर रात्रीची ईशाची नमाज अदा करून नियाजीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या मुबारक (शुभ) वेळी तमाम नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सवाबे दारैन (पुण्य) हासिल करावे असे आवाहन सुन्नी मुस्लिम जमात चिपळूण तर्फे करण्यात आले आहे.




