भातशेतीत युरिया ब्रिकेट्सचा वापर अधिक फायदेशीर; कृषिकन्या गटामार्फत भाटघरमध्ये प्रात्यक्षिक

(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे.)
भाटघर:भात पिकात नत्र खताची नासाडी रोखून त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी युरिया ब्रिकेट्सचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. याच तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषि महाविद्यालय, दापोली येथील ग्रामीण जागृती कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या गटाने भाटघर येथील शेतकरी श्री. प्रथमेश खोपकर यांच्या शेतावर युरिया ब्रिकेट्सच्या वापराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित केले.
युरिया ब्रिकेट्स हे संकुचित स्वरूपातील नत्रयुक्त खत असून ते जमिनीत खोलवर दिल्याने खताची नासाडी टळते. प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थिनींनी चार भात रोपांच्या मध्यभागी ७ ते १० सें.मी. खोलीवर एक युरिया ब्रिकेट्स ठेवण्याची शास्त्रीय पद्धत शेतकऱ्यांना करून दाखवली. एक गुंठा क्षेत्रासाठी साधारणपणे ६२५ युरिया ब्रिकेट्स पुरेशा ठरतात, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
युरिया ब्रिकेट्स वापराचे प्रमुख फायदे:
खताची बचत: नत्राची धूप व वायूच्या स्वरूपातील हानी थांबल्याने खताचा अपव्यय टळतो.
उत्पादनात वाढ: पिकाला योग्य प्रमाणात नत्र मिळाल्याने भाताचे उत्पादन वाढते.
श्रमाची बचत: खत वारंवार देण्याची गरज उरत नसल्याने खताच्या फेऱ्या आणि मजुरीचा खर्च कमी होतो.
या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी कृषिकन्या सलोनी राणे, विनया सुपे, दिया उतेकर, इशिका खेर, आकांक्षा मेश्राम, ईशा पाटील, वेदिका पाटील व कृष्णप्रिया नंबियार यांनी परिश्रम घेतले.
सदर उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ अस्लम डोसानी, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या प्रात्यक्षिकामुळे स्थानिक शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाची सोपी आणि किफायतशीर पद्धत समजण्यास मोठी मदत झाली.






