मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांची ‘द गुड पॉलिटिशियन 2026’ साठी राष्ट्रीय स्तरावर निवड

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी यांच्या प्रतिष्ठित ‘द गुड पॉलिटिशियन २०२६’ या राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातून प्राप्त झालेल्या हजारो अर्जांमधून केवळ ४५ जणांची या कार्यक्रमासाठी निवड झाली असून, यामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या विविध पार्श्वभूमीच्या निवडक राष्ट्रीय नेतृत्वामध्ये मुंबईतील तळागाळातून सामाजिक कार्य करणाऱ्या ॲड.दिपक सोनावणे यांची निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
नऊ महिन्यांच्या या नेतृत्व विकास प्रवासात लोकशाही व्यवस्था, सार्वजनिक धोरणे, प्रभावी नेतृत्व, जनतेशी संवाद, संघटन उभारणी आणि सिद्धांताधिष्ठित राजकारण यांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय नेते तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे मार्गदर्शन, संसद भवनाला भेट देऊन संसदीय कामकाजाचा अभ्यास तसेच देशातील विविध राज्यांना भेट देऊन तेथील सामाजिक-राजकीय वास्तव समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
घरेलू कामगार असलेल्या एकल महिलेचा मुलगा म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत उच्च शिक्षण पूर्ण करून, आजही मुंबईतील झोपडपट्टीत वास्तव्यास असलेले दिपक सोनावणे महिला व बाल हक्क संरक्षण, तृतीयपंथी समुदायाच्या असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी तसेच सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर कार्यरत आहेत. विविध समित्यांवर कार्यरत असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली ही दखल विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
तळागाळातील एका सामाजिक कार्यकर्त्याची देशभरातील विविध राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीच्या निवडक ४५ नेतृत्वामध्ये झालेली निवड ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून, झोपडपट्टीतून पुढे येणाऱ्या युवा नेतृत्वाच्या क्षमतेची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध राज्यांतील नेतृत्वासोबत शिकण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि देशातील सामाजिक-राजकीय वास्तवाचा अभ्यास करण्याची संधी ॲड.दिपक सोनावणे यांना मिळणार आहे.




