‘साहेबांच्या सहवासातून आम्ही घडलो’; स्वप्ना यादव यांचे भावोद्गार* *चिपळूण नागरी चे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या कृतज्ञतापूर्ण भावना

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या सहकार क्षेत्रातील ५० वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाचा गौरव करताना, त्यांच्या सहवासातून अनेक कार्यकर्ते व सहकारी घडल्याची भावना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी व्यक्त केली. “साहेबांच्या सहवासात राहून काम करण्याची, समाजाशी जोडून घेण्याची आणि जबाबदारीने पुढे जाण्याची शिकवण मिळाली. त्यांच्या तालमीत घडलेले आम्ही सर्वजण संस्थेची वाटचाल सक्षमपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
चिपळूण नागरीच्या सहकार भवन सभागृहात सुभाषराव चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना सौ. यादव बोलत होत्या. गेल्या १८ वर्षांपासून हा सोहळा सातत्याने आयोजित केला जात असून, त्यानिमित्त सहकार कार्यशाळा, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आणि विविध विधायक कार्यक्रम घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या सहकार क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर कायदे, संस्थेचे कामकाज आणि महिलांना मिळणाऱ्या संधी याबाबत सभासदांना प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
कोकणातील शेती, शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी झपाटून काम करणे हे चव्हाण साहेबांचे वैशिष्ट्य आहे. सातत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते,” असे यादव म्हणाल्या. ‘आपली माणसं, आपली संस्था’ हे ब्रीद प्रत्यक्ष कामातून सार्थ ठरत असून, संस्थेचे सुमारे १ लाख ५१ हजार ६७ सभासदांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
*‘चव्हाण साहेबांच्या आशीर्वादामुळेच माझा प्रवास यशस्वी’*
चिपळूण नागरीचे संचालक तथा पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले यांनी सुभाषराव चव्हाण यांनी आपल्यातील क्षमता ओळखून संधी दिल्याचे सांगितले. “साहेबांनी आमच्या शब्दाला किंमत दिली. गरजू माणसांना मदत करण्यासाठी त्यामुळे आम्हाला बळ मिळाले. संस्थेच्या संचालक मंडळात काम करण्याची संधीही त्यांनी दिली. माझ्या सार्वजनिक जीवनातील प्रवासात चव्हाण साहेबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही,” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
*‘आदर्श नव्हे, तर गुरु माऊली’*
संचालक रवींद्र भोसले यांनी चव्हाण साहेब हे आपल्यासाठी केवळ आदर्श नसून ‘गुरु माऊली’ असल्याचे सांगितले. “परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; त्याचप्रमाणे चव्हाण साहेबांनी सामान्य माणसांना आत्मविश्वास देत त्यांचे जीवन घडविले,” असे ते म्हणाले. अडचणीच्या काळात अनेकांना आधार देत माणसे घडविणे हे त्यांच्या कार्याचे मोठेपण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी वासूअप्पा मेस्त्री, नरसिंग शिंदे, रमण डांगे, जे.के. शिंदे, सौ. रेश्मा पवार, रामदास राणे, शाहीर शाहीद खेरटकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष कदम, सौ. सीमा रानडे, अविनाश आंब्रे व विजय कदम यांनीही मनोगत व्यक्त करून चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. कार्यक्रमाला सभासद, हितचिंतक, लोकप्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.




