कृषीकन्यांचा ‘एकात्मिक’ धडा! वनोशी तर्फे पंचनदी येथे पिकांवरील रोग व्यवस्थापनावर धमाकेदार प्रात्यक्षिक


*(दापोली: प्रतिनिधी-सागर गोवळे)*
धातोंडी वाडी (पंचनदी): पिकांवर कोणता रोग पडलाय? तो कसा ओळखायचा? आणि महागड्या रासायनिक फवारण्यांशिवाय तो कसा रोखायचा? यावर आता पंचनदीतील शेतकऱ्यांना काळजी करायची अजिबात गरज उरलेली नाही! ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी सखी’ गटाच्या विद्यार्थिनींनी धातोंडी वाडी येथे ‘एकात्मिक रोग व्यवस्थापन’ (IDM) या विषयावर अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे.
पिके तीच, पण माहिती नवी!
केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थिनींनी तक्ते आणि फोटोंचा भडीमार करत शेतकऱ्यांना अगदी थेट पिकांच्या रोगांची ओळख करून दिली.
भात: कडा करपा व जिवाणूजन्य पान करपा टाळण्यासाठी नत्राचा अतिवापर टाळा आणि योग्य अंतर ठेवा, असा मोलाचा सल्ला देण्यात आला.
नाचणी: मान करपा आणि पानावरील करपा कसा ओळखायचा, हे रंगीत छायाचित्रांद्वारे पटवून दिले.
आंबा: आंबा उत्पादकांची डोकेदुखी ठरणाऱ्या भुरी, अँथ्रॅकनोज आणि बांडगुळाचा नायनाट करण्यासाठी बागेची स्वच्छता आणि शिफारशीत औषधांचाच वापर कसा करावा, हे स्पष्ट केले.
नारळ व सुपारी: नारळावरील ‘कोंब कुजणे’ (Bud Rot) आणि सुपारीवरील घातक ‘कोलेरोगा’ (फळकूज) यावर पाण्याचा योग्य निचरा आणि शेत स्वच्छतेचा ‘मास्टरप्लॅन’ शेतकऱ्यांना देण्यात आला.
केवळ औषधे नाहीत, तर पर्यावरणपूरक ‘स्मार्ट’ शेती!
रासायनिक औषधांवरचा उधळपट्टीचा खर्च थांबवून सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक आणि भौतिक पद्धतींचा मेळ घालत रोगांचा बंदोबस्त कसा करायचा, या ‘एकात्मिक’ दृष्टिकोनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या भल्यामोठ्या शंकांचे कृषीकन्यांनी जागीच निरसन केले.
यांच्या मार्गदर्शनाने मारली बाजी:
हे यशस्वी प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. परेश पोटफोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
बातमीतील ‘आयडॉल’ कृषी सखी गट:
शेतकऱ्यांमध्ये जागृतीची ही मशाल पेटवणारे ‘कृषी सखी’ गटाचे नेतृत्व विद्यार्थिनी कु. शबरी चव्हाण, कु. संजना जंगले, कु. मधुजा घडशी, कु. पायल मोरे, कु. रिंकू बाजीया, कु. तरला श्रीदेवी, कु. दिविलीयू, कु. देवीप्रिया पी. टी., कु. श्रीलया एम., कु. मुस्कान कसोटीया आणि कु. नित्या राज यांनी अतिशय कौशल्याने केले. त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे!



