कृषीकन्या गटांकडून भाटघर येथे अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक


(*दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)*
दापोली:कृषि महाविद्यालय, दापोली येथील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि कन्या गटाच्या वतीने वृक्षवली काजू फॅक्टरीजवळ शेतकरी श्री. प्रथमेश खोपकर यांच्या सहकार्याने अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अझोल्याचे उत्पादन व पशुधनासाठी पूरक खाद्य म्हणून त्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
प्रात्यक्षिकासाठी ६ फूट × ४ फूट × १ फूट आकाराचा खड्डा तयार करून त्यामध्ये ताडपत्री अंथरण्यात आली. त्यात ४–६ इंच स्वच्छ पाणी भरून ३ किलो शेण, ३ किलो माती व ३० ग्रॅम SSP यांची स्लरी तयार करून पाण्यात मिसळण्यात आली. स्लरी स्थिर झाल्यानंतर त्यामध्ये अझोला कल्चर सोडण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाची पद्धत, योग्य देखभाल व नियमित काढणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अझोला हे पशुधनासाठी पौष्टिक पूरक खाद्य म्हणून उपयोगी असून कमी खर्चात तयार करता येते, याची माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.




