वणोशी तर्फ पंचनदी येथे ‘कृषी स्नेही’ समूहातर्फे फळप्रक्रिया प्रात्यक्षिक; महिला व शेतकऱ्यांना पपई जॅम अन् टोमॅटो केचअप निर्मितीचे धडे


(दापोली- प्रतिनिधी: सागर गोवळे.)
वणोशी तर्फ पंचनदी:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) संचलित कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ समूहातील विद्यार्थिनींनी वणोशी तर्फ पंचनदी येथे महिला व शेतकऱ्यांसाठी ‘फळ व भाजीपाला प्रक्रिया’ या विषयावर विशेष प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन वर्ग आयोजित केला होता. स्थानिक शेतीमालाची नासाडी थांबवून त्यावर प्रक्रिया करून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवावे, याचे प्रत्यक्ष धडे या वेळी उपस्थितांना देण्यात आले.
या उपक्रमात पपईपासून जॅम आणि टोमॅटोपासून केचअप तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी प्रक्रियेतील विविध टप्पे स्पष्ट केले. यामध्ये सायट्रिक ॲसिडचा वापर, साखरेचे योग्य प्रमाण, सलग ढवळणे, उष्णता नियंत्रण आणि जॅम व केचअपची गुणवत्ता तपासण्यासाठी उपयुक्त असणारी ‘ब्लॉटिंग पेपर टेस्ट’ यांसारख्या सोप्या पद्धतींची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी (SHG) अतिरिक्त उत्पादनावर प्रक्रिया करून स्वयंरोजगार सुरू केल्यास त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. तसेच सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाच्या ‘पीएम-एफएमई’ (PM-FME) योजनेचा लाभ कसा घ्यावा, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या यशस्वी आयोजनासाठी कृषी स्नेही समूहाच्या विद्यार्थिनी कु. समृद्धी जाधव, कु. नीलम मदने, कु. तन्वी नादिवडेकर, कु. श्रुती बोबडे, कु. साक्षी लोके, कु. अंकिता मुंज, कु. सलोनी सावंत, कु. कोमल झिरवाळ आणि कु. आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील महिला शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाला उस्फूर्त प्रतिसाद दिला




