चिपळूणच्या उड्डाणपुलावर ‘भराव’चा घाट; घाई कुणाच्या फायद्यासाठी? नागरिकांच्या सुरक्षेचा सवाल ऐरणीवर! : स्लॅब कोसळल्याच्या घटनेतूनही धडा नाही? लाखो रुपयांचा भराव टाकण्याची घाई नेमकी कशासाठी; सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांचा संतप्त सवाल

चिपळूणच्या उड्डाणपुलावर ‘भराव’चा घाट; घाई कुणाच्या फायद्यासाठी? नागरिकांच्या सुरक्षेचा सवाल ऐरणीवर!*
*🔸स्लॅब कोसळल्याच्या घटनेतूनही धडा नाही? लाखो रुपयांचा भराव टाकण्याची घाई नेमकी कशासाठी; सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांचा संतप्त सवाल*
चिपळूण : चिपळूण शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी आता पुलावर जाण्यासाठी सुरू असलेल्या भरावाच्या कामावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी याच उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे त्या घटनेतून धडा घेऊन प्रत्येक कामाची तांत्रिक आणि गुणवत्तेच्या निकषांवर काटेकोर तपासणी होणे अपेक्षित असताना, सध्या सुरू असलेल्या भरावाच्या कामाबाबत नागरिकांकडूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
*‘दूधाने तोंड पोळले की ताकही फुंकून प्यावे’* अशी परिस्थिती असताना पुन्हा घाईघाईने काम उरकण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी उपस्थित केला आहे.
कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून मोठा खर्च केला जात आहे, याची नागरिकांना पूर्ण जाणीव आहे. मात्र, गेली दहा-बारा वर्षे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचे जे ‘ससेहोलपट’ सोसले आहे, तेही सर्वांनी पाहिले आहे. यंदा काही काळ पुलाखालील विद्यमान रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवावी लागली असती, तरी चालले असते; मात्र त्यासाठी घाईघाईने लाखो रुपयांचा भराव टाकण्याचा घाट घालण्याची खरंच एवढी आवश्यकता होती का, असा सवाल नागरिकांच्या मनात आहे.
*‘घाईचे काम शैतानाचे’ ठरू नये!*
उड्डाणपुलाचे मुख्य काम पूर्ण झाले असले तरी साफसफाई, फिनिशिंग, लाइटिंग, डांबरीकरण, रंगकाम तसेच भरावाची कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. ही कामे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिपत्याखाली बीएमसी कंपनीकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या उड्डाणपुलाची लांबी सुमारे 1.87 किलोमीटर, तर रुंदी सुमारे 25 मीटर आहे. आंबेडकर चौक परिसरातील सुमारे 130 मीटरच्या भागात आठ गर्डर असून उर्वरित गर्डर सुमारे 40 मीटर लांबीचे आहेत. या संपूर्ण पुलासाठी तब्बल 182 खांब उभारण्यात आले आहेत.
एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पावर भराव टाकण्याचे काम सुरू असताना त्याची तांत्रिक पद्धत, वापरण्यात येणारे साहित्य, गुणवत्ता आणि भविष्यातील सुरक्षितता यांची स्वतंत्रपणे तपासणी होणे आवश्यक आहे. केवळ वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने घाईघाईत काम पूर्ण करण्यापेक्षा नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च मानली पाहिजे.
*गणेशोत्सवासाठी सुविधा हवी, पण सुरक्षेची किंमत मोजून नव्हे!*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना सुविधा देण्याची प्रशासनाची भूमिका योग्य असली, तरी त्यासाठी सुरक्षा निकषांना बगल देता कामा नये. हवामान अनुकूल होईपर्यंत आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कामाला वेळ देण्यात यावा. काही दिवसांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी लाखो रुपयांचा खर्च करून भराव टाकायचा आणि नंतर तो बदलायचा किंवा काढायचा असेल, तर या खर्चाचे औचित्य काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात या भरावामुळे किंवा संबंधित कामामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी प्रशासनाची, शासनाची की संबंधित ठेकेदाराची? हे आधीच स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्ही वाईट विचार करत नाही; मात्र या प्रकल्पाचा पूर्व इतिहास पाहता मनात भीतीदायक शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. आधी स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता भरावाचे काम करताना तांत्रिक पद्धत आणि गुणवत्ता तपासलीच पाहिजे. हवामान आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया लक्षात घेऊन काम पूर्ण करावे. केवळ वेळेचे नियोजन करण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होऊ नये,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
आता प्रश्न एकच — गणेशभक्तांच्या सोयीसाठी उड्डाणपूल खुला करण्याची घाई समजण्यासारखी आहे; पण त्या घाईत नागरिकांच्या सुरक्षिततेलाच ‘बायपास’ केले जाणार नाही ना?असा प्रश्न उपास्थित केला जात आहे.




