पत्रकार आशिष कारेकर यांना पितृशोक : वारकरी संप्रदायाचा आधारवड हरपला; आबा कारेकर यांचे निधन

प्रतिनिधी (मंगेश जाधव )
गुहागर तालुका वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध आचारी आणि ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत सेवेकरी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आबा कारेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी समर्पित केले होते. धार्मिक, आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. प्रसिद्ध आचारी म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि धार्मिक कार्यातील सहभागामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते.
पत्रकार आशिष कारेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने कारेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांना गुहागर तालुका प्रेस क्लबच्या व निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटना (रत्नागिरी जिल्हा )वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती सदैव जिवंत राहतील.




