दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला वणौशी व दुमदेव ग्रामस्थांचा तीव्र विरोध; तहसीलदार प्रशासनाला निवेदन सादर

प्रतिनिधी: सागर गोवळे.
*दापोली* :
दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी समाविष्ट गाव दुमदेव कार्यक्षेत्रातील भिवबंदर आधारीत प्रस्तावित २८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती (वणौशी व दुमदेव)’ तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने या प्रकल्पाचा तीव्र विरोध दर्शवणारे निवेदन तहसीलदार मॅडम यांना सादर करण्यात आले आहे.
ग्रामसभेत ठराव मंजूर
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत वणौशी तर्फे पंचनदी (समाविष्ट गाव दुमदेव) यांची विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या २८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील शेती, आंबा-काजू बागायती, पाणीपुरवठा, भूजल, सागरी परिसंस्थेवर तसेच स्थानिकांचा रोजगार, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेवर अत्यंत गंभीर व विनाशात्मक परिणाम होऊ शकतात, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी.
हा प्रकल्प आमच्या गावाच्या किंवा परिसराच्या हद्दीत कोणत्याही स्वरूपात मान्य नाही, तसेच या प्रकल्पाबाबत कोणतीही चर्चा, माहिती किंवा जनसुनावणी नको, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी एकमुखाने व सर्वानुमते अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी तीव्र विरोध दर्शवणारा ठराव (ठराव क्र. ०२/०१) मंजूर केला आहे.
ग्रामस्थांच्या भावनांचा आणि या ठरावाचा गांभीर्याने विचार करून, आमच्या परिसरात हा प्रकल्प होऊ नये तसेच या प्रकल्पाची कोणतीही कारवाई न करता तो पूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या पत्राची सत्यप्रत व ग्रामसभेचा ठराव पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मा. प्रांताधिकारी साहेब आणि मा. तहसीलदार साहेब, दापोली यांच्याकडे माहितीस्तव सविनय सादर करण्यात आला आहे.




