महाराष्ट्र

चिपळूण नागरीने शेतकरी आणि कुटुंबांना उभे करण्याचे काम केले; यापुढेही हे कार्य अधिक गतिमान करु : सुभाषराव चव्हाण : चिपळूण नागरीच्या ३३ वर्षातील वाटचालीचा मान्यवरांकडून गौरव : सहकार मेळावा, प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान

Oplus_16908288
Oplus_16908288

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमागे सर्वसामान्यांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. या माध्यमातून अनेक शेतकरी आणि कुटुंबांना उभे करण्याचे काम केले आहे. यापुढेही हे कार्य अधिक गतिमान करू. तसेच वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कोकणासह महाराष्ट्रात नवा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. वैयक्तिक वाद-विवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने काम केल्यास कोकणाच्या विकासात मोलाचे योगदान देता येईल, असे प्रतिपादन चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या ३३ वा वर्धापन दिन, सहकार मेळावा, प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी केले. हा कार्यक्रम बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन सभागृहात झाला.

यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सेवानिवृत्त अप्पर आयुक्तता सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस.बी. पाटील, सेवानिवृत्त सहनिबंधक पतसंस्था सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे मिलिंद सोबले, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे डॉ. सोपान शिंदे, आंतरराष्ट्रीय किर्तीचे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी ) संचालिका ऍड. नयना पवार यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.

यावेळी मनोगतात सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या ३३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या कार्यकुशल प्रशासकीय कार्यपद्धतीचा गौरव केला. चिपळूण नागरी सलग ३० वर्ष १५ टक्के डिव्हिडंड देणारी एकमेव पतसंस्था ठरली आहे. या संस्थेने जोखीम स्वीकारत यश मिळवले आहे, अशा शब्दात चिपळूण नागरीच्या वाटचालीचे कौतुक केले.

*▪️चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण दूरदृष्टी नेतृत्व- मिलिंद सोबले*
सेवानिवृत्त सहनिबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे मिलिंद सोबले यावेळी म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडे सहकार क्षेत्राविषयी अभ्यास असून दूरदृष्टी आणि कष्टाळू नेतृत्व आहेत. तर दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचे कुशल प्रशासन, संस्थेविषयी तळमळ आणि चिपळूण नागरीचे मोठे भांडवल म्हणजे सभासदांचा विश्वास यामुळे ही संस्था यशोशिखरावर पोहोचली आहे, अशा शब्दात संस्थेच्या ३३ वर्षातील यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.

*▪️…तर संस्थांची प्रगती निश्चित-डॉ. सोपान शिंदे*
सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी आपल्या मनोगतात “सहकार क्षेत्रात सभासदांशी थेट संपर्क, कर्जदारांच्या जातीने भेटी आणि विश्वासाचे संबंध महत्त्वाचे आहेत. सुभाषराव चव्हाण यांनी ३३ वर्षे संस्थेचे संगोपन करून आदर्श कार्यपद्धती निर्माण केली. आधुनिक तंत्रज्ञानासोबत माणसांमधील नाळ जपल्यास सहकारी संस्थांची प्रगती निश्चितपणे साधता येईल, असे सांगितले.

*▪️सुभाषराव चव्हाण ‘देवमाणूस’ -बाबासाहेब परीट (बिळाशी)*
ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी) यांनी चिपळूण नागरीच्या ३३ वर्षातील वाटचालीचे कौतुक करताना संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा ‘देव माणूस’ असा उल्लेख केला. चिपळूण नागरी संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचली असून तिने सर्वांना सावली दिली आहे. या संस्थेने माणसे उभी करण्याचे काम केले आहे. ‘सावकारीला पर्याय म्हणजे सहकार’ होय. या पतसंस्थेची ३३ वर्षातील वाटचाल पाहता ‘शेड्युल बँक दर्जाचे’ या पतसंस्थेने काम केले आहे. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना तुम्ही शतायुषी व्हा, अशा शब्दात सदिच्छा दिल्या. तसेच पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

*▪️चिपळूण नागरीने सहकाराची गोडी निर्माण केली- प्रशांत यादव*
वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यावेळी म्हणाले की, चिपळूण नागरी पतसंस्थेचे वटवृक्ष झाले आहे. या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडे प्रचंड कष्ट करण्याची तयारी, सातत्य, कामावर ठाम विश्वास यामुळे या पतसंस्था पतसंस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. या प्रवासात लोकांचा विश्वास जिंकला आहे. ‘आपली माणसं आपली संस्था’ या ब्रीदवाक्याप्रमाणे या पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. सहकार रुजवला, वाढवला. सहकाराची गोडी निर्माण केली, या शब्दांत पतसंस्थेच्या वाटचालीच्या कार्याचा गौरव केला.

*▪️तीन तपांचा प्रवास म्हणजे विश्वासार्हतेचा प्रवास-सौ. स्वप्ना यादव*
चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या ३३ वर्षातील वाटचालीचा आढावा घेताना म्हणजे तीन तपांचा प्रवास म्हणजे विश्वासार्हतेचा प्रवास असा उल्लेख करत मेहनत, चिकाटी असल्याशिवाय यश मिळत नाही. संस्थेच्या सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाची साथ यामुळे संस्थेने आजपर्यंतचा प्रवास यशस्वी होऊ शकला, अशा शब्दात भावना व्यक्त करतांना संस्थेशी आपले असलेले सर्वांचे संबंध भविष्यात आणखी दृढ व्हावेत, अशी अपेक्षा शेवटी सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे या चिपळूण नागरी पतसंस्था संचालित सहकारी संस्था प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह मान्यवर तसेच वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव मेस्त्री, समीर होडबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, सह्याद्री शिक्षण संस्थेची कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम आदींनी मनोगते मांडली. यावेळी भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, खेर्डी ग्रामपंचायत माजी सदस्य बाळा दाते, जिल्हा परिषद सदस्य सौ. रावी मोरे, उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. आदिती गुढेकर, चिपळूण शहराध्यक्षा सौ. रुही खेडेकर, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, भाजप चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!