भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण

प्रतिनिधी (मंगेश जाधव)
रायगड जिल्ह्याला अखेर नवे पालकमंत्री मिळाले असून राज्य सरकारने महाड, पोलादपूर, माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार भरत शेठ गोगावले हे मतदारसंघातील विकासकामांसह सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या थेट संपर्कासाठी परिचित आहेत. आता रायगड जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोगावले यांच्या नियुक्तीची घोषणा होताच महाडसह खेड आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागांत शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी ‘भरत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रायगड जिल्ह्यात पर्यटन, उद्योग, शेती तसेच पूरग्रस्त भागांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले प्रभावीपणे लक्ष देतील आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.




