मुगीजमध्ये भाताची ‘ब्रिकेट्स’ कमाल! दापोली कृषी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे धडाकेबाज प्रात्यक्षिक




(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)
दापोलीत:पारंपरिक पद्धतीने खते फेकून देऊन खताचा आणि पैशांचा अपव्यय टाळायचाय? मग दापोली कृषी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुगीज गावात दाखवलेला हा ‘स्मार्ट’ फॉर्म्युला प्रत्येक भात उत्पादक शेतकऱ्यासाठी कामचा ठरणार आहे!
ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘बिजांकूर’ गटातील विद्यार्थ्यांनी मुगीज येथील शेतकरी नीता शिगवण यांच्या शेतात ‘युरिया–डीएपी ब्रिकेट्स’ वापराचे थेट प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
काय आहे हा ब्रिकेट्सचा ‘मॅजिक’ फॉर्म्युला?
पारंपरिक युरिया पाण्यात वाहून जातो किंवा वाफेच्या रूपाने हवेत उडून जातो. पण ३४% नत्र आणि १८% स्फुरद असलेली ही ब्रिकेट रोपाच्या मुळाजवळ गाडली की खताची बचत अन् पिकाची भरघोस वाढ ठरलेलीच!
योग्य वेळ: भात रोपलागवडीनंतर ७ ते १० दिवसांच्या आत.
योग्य पद्धत: चार भाताच्या रोपांच्या अगदी मधोमध ७ ते १० सेंमी खोलवर ब्रिकेट खोचणे.
गणित सोपं आहे: १ गुंठ्यासाठी फक्त ६२५ ब्रिकेट्स पुरेसे!
फायदे ऐकून शेतकरी खूश!
बचतच बचत: खताचा अपव्यय टळतो आणि अनावश्यक खर्च थांबतो.
दमदार वाढ: मुळांचा व फुटव्यांचा जोर वाढून पीक टणक येते.
वेळ आणि कष्टाची बचत: बारंवार खत देण्याची कटकट मिटल्याने मजुरीचा खर्च वाचतो.
नियम एकच: ब्रिकेट्स साचलेल्या पाण्यात किंवा पृष्ठभागावर फेकायच्या नाहीत, फक्त जमिनीच्या पोटात गाडायच्या!
सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई, अस्लम डोसानी, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मुगीजच्या १० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रात्यक्षिक पाहून, “आता भाताला ब्रिकेट्सचीच ताकद देणार!” असा सूर शेतकऱ्यांमधून उमटला.




