खडपोली मोहल्ला नंबर १ मध्ये विजेचा लपंडाव; दोन वर्षांपासून थ्री-फेज लाईनची प्रतीक्षा : फॅन, फ्रिज, टीव्ही, मिक्सरसह विद्युत उपकरणे धोक्यात; नागरिक त्रस्त — सामाजिक कार्यकर्ते फिरोज कडवईकर यांची तातडीने उपाययोजनेची मागणी
खडपोली : खडपोली मोहल्ला नंबर १ येथील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करीत आहेत. परिसरातील थ्री-फेज वीजपुरवठ्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून, याबाबत महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे घरातील पंखे व्यवस्थित चालत नाहीत. पंखे सुरू असले तरी पुरेसा वेग नसल्याने अपेक्षित हवा मिळत नाही. फ्रिज, टीव्ही, मिक्सर यांसारख्या विद्युत उपकरणांवरही कमी-जास्त वीजदाबाचा परिणाम होत असून, उपकरणे खराब होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः उन्हाळ्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर घरातील इन्व्हर्टरवर पंखे चालवावे लागतात. मात्र इन्व्हर्टरची क्षमताही मर्यादित असल्याने उकाड्याचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांना उष्णतेचा मोठा त्रास होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
वीजपुरवठ्याच्या या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दोन वर्षांचा पाठपुरावा करूनही थ्री-फेज लाईनचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते फिरोज कडवईकर यांनी व्यक्त केली.
“खडपोली मोहल्ला नंबर १ मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या समस्येला सामोरे जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आपण संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन थ्री-फेज वीजलाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फिरोज कडवईकर यांनी केली आहे.
वीजपुरवठ्याच्या या समस्येमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विद्युत उपकरणांचे यापुढेही नुकसान होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात आणि खडपोली मोहल्ला नंबर १ मधील नागरिकांची गैरसोय कायमची दूर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




