वणोशी येथे भातशेतीमध्ये हिरवळीच्या खताच्या वापराचे प्रात्यक्षिक संपन्न


(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे.)
वणोशी:ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘कृषी स्नेही’ गटामार्फत वणोशी तर्फ पंचनदी येथील वडवाडी येथे भातशेतीमध्ये हिरवळीच्या खताच्या वापराचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले.
या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकर्यांना गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) या हिरवळीच्या खताचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गिरीपुष्पाचा ताजा पाला भातशेतीमध्ये समान प्रमाणात पसरवून चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांना व तज्ज्ञांनी शेतकर्यांना समजावून सांगितली.
गिरीपुष्पाचे महत्त्वाचे फायदे व पोषणमूल्य:
पोषक घटक: गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये २.७५% नत्र, ०.५% स्फुरद आणि १.१५% पालाश असते.
शीघ्र उपलब्धता: पाला लवकर कुजत असल्याने ही अन्नद्रव्ये भात पिकाला त्वरित उपलब्ध होतात.
सुलभ लागवड: गिरीपुष्पाची लागवड शेताच्या बांधावर किंवा पडिक जमिनीत करता येते. एका गुंठ्यासाठी ४ ते ६ झाडांचा पाला पुरेसा ठरतो.
खतांची बचत: विद्यापीठाच्या संशोधनानुसार, १० टन प्रति हेक्टर गिरीपुष्पाचा पाला वापरल्यास रासायनिक खताच्या शिफारसीत मात्रेइतके (१००:५०:५० किलो नत्र, स्फुरद, पालाश) उत्पादन मिळते.
या खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढून रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो. प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कमी खर्चात शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
सदर उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ श्री. अस्लम डोसानी, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘कृषी स्नेही’ गटातील विद्यार्थिनी कु. कोमल झिरवाळ, कु. आकांक्षा गाडगे, कु. सलोनी सावंत, कु. अंकिता मुंज, कु. नीलम मदने, कु. साक्षी लोके, कु. श्रुती बोबडे, कु. तन्वी नादिवडेकर, कु. श्रावणी मोरे व कु. समृद्धी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.




