सामाजिक कार्याची दखल; राधाई फाउंडेशन चिपळूण जिल्हा रत्नागिरी संस्थापक अध्यक्षा राधाताई लवेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार



चिपळूण : सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राधाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राधाताई लवेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘रणरागिणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या नीती आयोगाशी संलग्न तसेच महाराष्ट्र शासनाचे जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्थेच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. पर्यावरण, व्यसनमुक्ती, महिला, कृषी, अन्न, बेरोजगारी, वृद्ध नागरिक तसेच वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव या माध्यमातून करण्यात आला.
राधाताई लवेकर या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, महिला सक्षमीकरण, सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठविणे, पर्यावरण संवर्धन, प्राणी कल्याण, एकल पालक, जनजागृती आणि गरजू घटकांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकारातून राधाई फाउंडेशनच्या माध्यमातूनही विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबविले जात आहेत.
पुरस्काराच्या सन्मानपत्रात त्यांच्या कार्याचा गौरव करताना, समाजहितासाठी केलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला असून, यापुढेही देशाच्या उन्नतीसाठी कार्य सुरू ठेवण्याची प्रेरणा देण्यात आली आहे.
“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आणि प्रेरणा आहे. समाजातील गरजू, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांसाठी माझे कार्य यापुढेही सुरूच राहील,” अशी भावना राधा लवेकर यांनी व्यक्त केली.
या सन्मानामुळे चिपळूणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राधाई फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, राधाताई लवेकर यांच्या कार्याचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.




