युवा प्रेरणा कट्टा’तर्फे दापोलीत पोलीस बांधव व आरोग्य कर्मचार्यांचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात



( दापोली -प्रतिनिधी:सागर गोवळे.)
दापोली:कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान (कोळथरे) संचलित ‘युवा प्रेरणा कट्टा’च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत यंदाचा रक्षाबंधनोत्सव दापोली पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात अहोरात्र सेवा बजावणार्या पोलीस बांधवांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्यांना राख्या बांधून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या वेळी देण्यात आला.
युवा प्रेरणा कट्ट्याकडून दरवर्षी ‘एक राखी जवानांसाठी’ हा विशेष उपक्रम राबवला जातो. यंदा या उपक्रमाला शालेय व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोड देण्यात आली. शालेय गटासाठी ‘राखी बनवा’ स्पर्धा, तर उच्च माध्यमिक गटासाठी सीमेवरील जवानांना उद्देशून ‘पत्रलेखन व कविता लेखन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या राख्या विशाखापट्टणम येथील नौदल बेसवर (Naval Base) तैनात असलेल्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून नारळी पौर्णिमेच्या औचित्याने दापोली पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचार्यांना राख्या बांधण्यात आल्या. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोरसकर साहेब, पी.एस.आय. यादव व साखरकर, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मोमीन, डॉ. बनसोडे, डॉ. भोजने, डॉ. मोघे आणि संपूर्ण आरोग्य पथकाला भगिनींनी प्रेमाची राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उत्कृष्ट नियोजनाने उपक्रम यशस्वी
या सामाजिक उपक्रमाचे नियोजन युवा प्रेरणा कट्ट्याचे कार्यकर्ते श्रीप्रीति वैद्य, गौरी खरे, पायल खानविलकर, गौरी खोत, अवंती केळकर, ऋतिक उगले, प्रमोद पांगारकर, सुमेध करमरकर, नचिकेत बेहरे, मिहीर महाजन आणि गौरव खरे यांनी केले. युवा प्रेरणा कट्ट्याच्या या उपक्रमाचे दापोली शहर व परिसरातून कौतुक होत आहे.




