संगमेश्वर कळंबस्ते सुपुत्राचा राष्ट्रीय गौरव : प्रा.बासिम नेवरेकर यांना ‘परिवर्तनकारी शिक्षक पुरस्कार’
अभिनंदनाचा वर्षाव

संगमेश्वर / सत्यवान विचारेसंगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावचे सुपुत्र तथा नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS)च्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील कायदा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. बासीम झियादत अली नेवरेकर यांना विधी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘विधी शिक्षणातील परिवर्तनकारी शिक्षक’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘बेस्पोक ग्लोबल लीगल समिट २०२६’ या राष्ट्रीय परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. नेवरेकर यांनी कॉर्पोरेट लॉ, व्यावसायिक करार, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, विलीनीकरण व संपादन तसेच लवाद आणि नियामक विषयांमध्ये केलेल्या अध्यापन व संशोधनाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
परिषदेत त्यांचा ‘विशेष कायदेविषयक नेता’ म्हणूनही गौरव करण्यात आला.
कळंबस्तेसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संगमेश्वर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रात मोठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा. नेवरेकर यांच्यावर कळंबस्ते पंचक्रोशीसह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




