शाळकरी विद्यार्थी बनले चक्क प्रेस रिपोर्टर प्रशासनाला केले जागे!खड्डे भरण्यास सुरवात


(प्रतिनिधी – मंगेश जाधव)
रस्त्यावरचे खड्डे, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि नागरिकांची होणारी गैरसोय याकडे वारंवार दुर्लक्ष होत असताना खांडपे जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट ‘ग्राउंड रिपोर्ट’च सादर केला. विशेष म्हणजे, हातात माईक नसल्याने छत्रीलाच माईक बनवत या मुलींनी केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आणि अखेर प्रशासनाला रस्त्याच्या दुरवस्थेवर कारवाई करावी लागली.
कर्जत तालुक्यातील खांडपे–कोंदिवडे रस्त्याची अवस्था गेल्या काही काळापासून अत्यंत खराब झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत होते. त्यामुळे दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खांडपे जिल्हा परिषद शाळेतील नेहा घारे आणि मानसी पवार या विद्यार्थिनींनी भन्नाट कल्पना लढवली. नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका साकारली, तर मानसी पवार हिने मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण ‘रिपोर्टिंग’ टिपले. हातात माईक नसल्याने चक्क छत्रीचा माईक म्हणून वापर करण्यात आला.
रस्त्यावरील खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि नागरिकांना होणारा त्रास याचे वास्तव या चिमुकल्या पत्रकारांनी आपल्या पद्धतीने मांडले. कोणतेही मोठे माध्यम, पत्रकारांचा ताफा किंवा महागडी उपकरणे नसताना केवळ मोबाईलच्या कॅमेऱ्यातून त्यांनी प्रशासनासमोर रस्त्याची वस्तुस्थिती मांडली.
या मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. अखेर या व्हिडीओची आणि नागरिकांच्या समस्येची दखल घेत खांडपे–कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक आमदारांनी रस्त्याच्या दुरवस्थेची माहिती मिळताच संबंधित विभागाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळून सुरक्षित वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मोठ्यांना जे जमले नाही, ते चिमुकल्यांनी करून दाखवले!
वर्षानुवर्षे रस्त्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नाला या मुलींनी आपल्या निरागस पण प्रभावी शैलीत आवाज दिला. छत्रीचा माईक आणि मोबाईलचा कॅमेरा एवढ्याच साधनांच्या जोरावर त्यांनी प्रशासनाला जागे केले.
प्रश्न मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ लागत नाही; प्रश्नात ताकद आणि मांडणीत धाडस असेल तर छोटासा आवाजही प्रशासनाच्या कानावर पोहोचतो, हे या चिमुकल्या पत्रकारांनी दाखवून दिले.




