*वानोशी तर्फ पंचनदी येथे केळी पिक व्यवस्थापन आणि उपपदार्थांवर कृषी सखी गटाचे प्रात्यक्षिक संपन्न

(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे.)
वानोशी तर्फ पंचनदी (धातोंडी वाडी):ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी सखी गटाच्या वतीने श्री. अरुण उजाळ यांच्या शेतावर केळी पिकाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, टिश्यू कल्चर रोपांचा वापर आणि केळीच्या उपपदार्थांबाबत शेतकरी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील ११ शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रात्यक्षिकादरम्यान कृषी कन्यांनी केळीच्या बुंध्यापासून येणाऱ्या पाणी कोंब (Water sucker) आणि स्वोर्ड कोंब (Sword sucker) यातील मुख्य फरक स्पष्ट केला. स्वोर्ड कोंबांची पाने अरुंद व तलवारीसारखी टोकदार असून त्यांचे खोड मजबूत असते, त्यामुळे पुनर्लागवडीसाठी ३ ते ४ महिने वयाच्या (५०० ते ७५० ग्रॅम वजनाच्या) स्वोर्ड कोंबांचीच निवड करावी, असा सल्ला देण्यात आला. याउलट, मुख्य झाडाचे अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी होणारे नुकसान टाळण्यासाठी पाणी कोंब विळ्याने कापून, त्यावर ‘+’ अशी खूण करून रॉकेलचे थेंब टाकून ‘देशकरिंग’ (Desuckering) करण्याची सोपी पद्धत प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) द्वारे विकसित टिश्यू कल्चर (ऊती संवर्धन) केळी रोपांच्या फायद्यांबद्दल विद्यार्थिनी पायल मोरे व मधुजा घडशी यांनी सविस्तर माहिती दिली. रोगमुक्तता, समान वाढ, लवकर परिपक्वता आणि अधिक उत्पादनासाठी टिश्यू कल्चर रोपे कशी फायदेशीर आहेत हे सांगताना विद्यापीठातील रोपांचे अधिकृत दर जाहीर करण्यात आले:
जी-९: ₹ १४/- प्रति रोप
सफेद वेलची: ₹ २०/- प्रति रोप
लाल वेलची (रेड बनाना): ₹ ३०/- प्रति रोप
याशिवाय, केळीच्या खोडापासून तंतू निर्मिती, पानांचा ताट म्हणून वापर, मोहराची भाजी, केळीची साल व उर्वरित भागापासून कंपोस्ट खत निर्मिती, तसेच फळांपासून चिप्स व प्युरी यांसारखे मूल्यवर्धित उपपदार्थ बनवून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिक आणि कार्यक्रम डॉ. बी. एस. के. व्ही. दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. महेश एम. कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशीष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सखी गटातील विद्यार्थिनी कु. शबरी चव्हाण, संजना जंगले, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी परिश्रम घेतले. प्रात्यक्षिकानंतर यजमान शेतकरी श्री. अरुण उजाळ व उपस्थितांनी कृषी कन्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.




