‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष : चिपळूणमध्ये दोन सार्वजनिक तर सुमारे १००० खाजगी गणरायांचे विसर्जन संपन्न : नगर परिषद प्रशासन सतर्क : पोलिसांचा चोख बंदोबस्त

चिपळूण : लाडक्या गणरायाच्या आगमनाने अवघे चिपळूण गणेशमय झाले असतानाच पाच दिवसांच्या बाप्पाला व गौराईला शनिवारी १९ तारखेला भक्तिमय आणि भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषाने चिपळूण शहरातील विविध भाग दुमदुमून गेले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद, गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनासाठी चिपळूण नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली होती. तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
*गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष*
गणरायाच्या विसर्जनासाठी दुपारनंतरच भाविकांची लगबग सुरू झाली होती. आकर्षक सजावट केलेल्या वाहनांमधून तसेच काही भाविकांनी गणेशमूर्ती हातात घेऊन विसर्जनस्थळांकडे प्रस्थान केले. अनेक घरांमध्ये विसर्जनापूर्वी श्रींची विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. बाप्पा, आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवावी आणि पुढील वर्षी पुन्हा सुख-समृद्धी घेऊन यावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली. शहरातील बाजारपूल, पेठमाप, गोवळकोट, खंड बावशेवाडी शिवनदी, बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदी तसेच पाग नदीकिनारी असलेल्या विसर्जनस्थळांवर सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरती करून बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
*बाप्पाला निरोप देताना डोळे पाणावले*
श्री गणरायांच्या प्रतिष्ठापना झालेल्या १७ सार्वजनिक व १६ हजार ७२५ गणेश मूर्तींपैकी दीड दिवसाचा एक सार्वजनिक व २८५५ घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन झाले होते आता शनिवारी दोन सार्वजनिक व सुमारे १००० घरगुती गणरायांचे विसर्जन गौराई बरोबर झाले. यंदा सहा दिवस बाप्पाची सेवा, पूजा-अर्चा आणि आरती केल्यानंतर निरोपाची वेळ येताच अनेक गणेशभक्त भावूक झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देण्याची हुरहूर दिसून येत होती. ‘पुढच्या वर्षी लवकर’ या म्हणत भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, चिपळूण नगर परिषद आणि संबंधित यंत्रणांकडून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचे नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
*पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश*
गणेशमूर्तीचे विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. नगर परिषदेने निर्माल्य संकलनासाठी काही ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते. विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलाव, पारंपारिक विसर्जनस्थळे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करण्यावर भर देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवक सज्ज ठेवण्यात आले होत. रात्री अंधारात अडचण नको यासाठी हॅलोजन लावण्यात आले होते. नगर परिषद प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला गंणेशभक्तानी चांगला प्रतिसाद दिला. दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनानंतरही चिपळूणमधील गणेशोत्सवाचा उत्साह मात्र कायम होता. आता अनंत चतुर्दशीला होणाऱ्या सुमारे ४००० मूर्तीच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांतही चिपळूण शहर आणि तालुक्यात गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! चा जयघोष घुमत राहणार आहे.




