मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रत्नागिरीत बैठक; बूथनिहाय नियोजनावर भर!
रत्नागिरी : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६६ चे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. जयंद्रथ खताते यांची दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीनंतर रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक प्रदेश समन्वयक जयंद्रथ खताते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या पहिल्याच बैठकीला पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्तम उपस्थिती होती. यावेळी जयंद्रथ खताते यांनी पक्षांतर्गत काम करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांच्या अडचणी व सूचना पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आपल्या माध्यमातून मांडण्यात येतील, असे आश्वासन खताते यांनी यावेळी दिले.
तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघातील प्रत्येक बूथनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवरील मतदार यादी अचूक असावी, दुबार नावे वगळली जावीत आणि नवीन मतदारांची नोंदणी व्हावी, याबाबत नियोजन करण्यात आले.
या बैठकीला तालुकाध्यक्ष बंटी वनजू, ज्येष्ठ नेते बशीरभाई मुर्तुजा, युवक पदाधिकारी नौसीन काझी, नारायण खेरोटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, खेर्डीचे माजी सरपंच रवींद्र फाळके यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




