महाराष्ट्र

संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी वहाळ जिल्हा परिषद गटात ‘मिशन बंधारे’ला प्रारंभ : गावागावांत लोकसहभागातून बंधारे उभारण्याचे जि.प.सदस्या शिवानी सावंत यांचे आवाहन

चिपळूण:- संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात अधिकाधिक उपयोग करता यावा, या उद्देशाने पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या सूचनेनुसार वहाळ जिल्हा परिषद गटात ‘मिशन बंधारे’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जि.प.सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या पुढाकाराने वहाळ-भराडवाडी येथे ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागातून बंधाऱ्यांच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. लोकसहभागातून गावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, यावर भर दिला जात आहे. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग आणि श्रमदान हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे. वनराई व विजय बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे पाणी साठवणुकीला चालना मिळण्याबरोबरच शेती आणि दैनंदिन पाण्याच्या गरजांसाठीही भविष्यात त्याचा लाभ होण्यास मदत होऊ शकते
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याची गरज आहे. उपलब्ध साधनसामग्री, ग्रामस्थांचे श्रमदान आणि प्रशासनाच्या सहकार्याच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे व्यापक स्वरूपात राबविता येऊ शकतात. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या गावातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जि.प.सदस्या सौ.शिवानी सावंत यांनी केले. लोकसहभागातून उभे राहणारे बंधारे भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावांना आधार देऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!