कृषिस्नेही गटा’तर्फे वणोशीत कृषी माहिती केंद्राचे दिमाखदार आयोजन शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना गिरवले आधुनिक शेतीचे धडे



(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)
वणोशी/दापोली:
ग्रामीण भागातील विद्यार्थी,शेतकरी आणि सर्वसामान्यांपर्यंत आधुनिक व शास्त्रीय कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘कृषिस्नेही गटा’तर्फे जि. प. प्राथमिक शाळा, वणोशी तर्फ पंचनदी (गुरववाडी) येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘ज्ञानवर्धक कृषी माहिती केंद्रा’चे आयोजन करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन वणोशीचे उपसरपंच श्री. प्रकाश तेरेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
आधुनिक शेती, मॉडेल्स आणि प्रात्यक्षिकांवर भर
या कृषी माहिती केंद्रात विविध कृषी विषयांचे सादरीकरण माहितीपत्रके, प्रत्यक्ष नमुने आणि आकर्षक मॉडेल्सद्वारे करण्यात आले.
नैसर्गिक शेती: प्रदर्शनात बीजामृत, जीवामृत व गोकृपा अमृतम यांची निर्मिती आणि शेतीतील महत्त्व समजावून सांगण्यात आले.
पाणी व खत व्यवस्थापन: पावसाचे पाणी साठवण, वर्मीवॉश, गांडूळखत, लाखी बाग आणि मिनिएचर गार्डन यांच्या प्रतिकृती (मॉडेल्स) तयार करून कमी खर्चात उपयुक्त उपक्रम कसे राबवावेत, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कीटक व्यवस्थापन व मूल्यवर्धन: विदेशी फळे, विविध खते, मूल्यवर्धित उत्पादने आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या हानिकारक कीटकांचे जिवंत नमुने ठेवून त्यांच्या व्यवस्थापनाची व वनस्पती संरक्षण किटची माहिती देण्यात आली.
’कृषी माहिती कट्टा’ ठरला आकर्षण
प्रदर्शनातील ‘कृषी माहिती कट्टा’ उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. यामध्ये कृषीस्नेही गटाच्या जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेले विविध वाण आणि कृषी अवजारांची माहिती देण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार बियाण्यांची निवड, उगवण चाचणी व दर्जेदार बियाण्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक
या प्रदर्शनास श्री. अशोक जाधव, सौ. साक्षी गुरव, श्री. गोविंद सूर्यवंशी यांच्यासह कृषी महाविद्यालय, दापोलीचे डॉ. प्रवीण झगडे, डॉ. रणजीत महाडिक आणि डॉ. विजय देसाई यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी केलेली कल्पक मांडणी, प्रत्यक्ष नमुने आणि सादरीकरणाचे सर्वच मान्यवरांनी विशेष कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी
कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. रणजीत महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिस्नेही गटाच्या समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे या विद्यार्थ्यांनी माहिती संकलनापासून ते सादरीकरणापर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रशांत जालगावकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.




