महाराष्ट्र
गुळवणे येथे ‘जमीन आरोग्य व सुपीकता’ कार्यक्रम संपन्न; माती परीक्षणातून शेतीची सुपीकता जपण्याचे आवाहन : वहाळ जिल्हा परिषद गटाला शेतीसमृद्ध व आदर्श गट बनविण्याचा संकल्प-जि.प. सदस्या शिवानी सावंत


यापूर्वी घेण्यात आलेल्या मातीच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील तपासणीचे अहवाल अर्थात मृदा आरोग्य पत्रिका यावेळी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या. या पत्रिकेच्या माध्यमातून जमिनीतील पोषक घटकांची स्थिती समजून घेऊन शेतीचे योग्य नियोजन करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी वहाळ जिल्हा परिषद गटाला शेतीसमृद्ध व आदर्श जिल्हा परिषद गट बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. गटातील प्रत्येक गावात शासनाच्या कृषी योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शहरांकडे गेलेल्या तरुण पिढीलाही आधुनिक शेतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून तरुणांना पुन्हा शेतीकडे वळवून गावची शेती अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मानवी आरोग्याची तपासणी करून शरीरातील कमतरता ओळखली जाते, त्याचप्रमाणे शेतीचा पाया असलेल्या जमिनीचे आरोग्य तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले. मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे जमिनीची स्थिती समजून घेऊन शेतीचे नियोजन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निरोगी जमीन, निरोगी पीक आणि समृद्ध शेतकरी या उद्देशाने शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या सौ. संजीवनी खापरे, रत्नागिरी जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी सौ. सारिका पाटील, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न मेत्रे, मंडळ कृषी अधिकारी विकास पिसाळ ,सचिन शिगवण यांच्यासह गुळवणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




