दाभोळ जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची आढावा बैठक उत्साहात संपन्न

<img src="h<img src="http

*(दापोली- प्रतिनिधी:सागर गोवळे)*
दाभोळ: ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद गट दाभोळ प्रभाग समितीच्या आढावा बैठकीत विविध विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य सौ. साधना मिहीर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीस पंचायत समिती उपसभापती सौ. नम्रता तोडणकर, पंचायत समिती सदस्य सौ. अंकिता घुबडे, विस्तार अधिकारी श्री. विघ्नेश खांडके यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांचा अन् योजनांचा सखोल आढावा
बैठकीदरम्यान प्रभाग समिती अध्यक्षांनी दाभोळ गटातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गावांमधील मंजूर विकासकामे, घरकुल योजना, तसेच दिव्यांग, शेतकरी, महिला व एकल पालक लाभार्थींच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक संवाद घडून आला.
शासकीय विभागांची झाडाझडती
शासकीय विभागनिहाय आढावा घेताना जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, उमेद, लघुपाटबंधारे, पाणीपुरवठा, महावितरण आणि एस.टी. महामंडळ अशा विविध विभागांच्या योजनांची माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामे आणि योजनांच्या अंमलबजावणीचा लेखी तपशील तात्काळ सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ग्रामस्थांची नाराजी; त्वरित कार्यवाहीचे आदेश
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत व देखभाल-दुरुस्तीच्या अभावाबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सौ. साधना महाजन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत त्वरित पावले उचलून तसा लेखी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
"लोकप्रतिनिधी, प्रशासन अन् ग्रामस्थ ही एक टीम"
बैठकीचा समारोप करताना सौ. साधना महाजन म्हणाल्या, "लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ ही गावाच्या विकासासाठी एकत्र काम करणारी एक टीम आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच या टीमची मुख्य जबाबदारी आहे."




