दसपटी मधील गणेशपूर-तिवडी तील बीएसएनएल चे टॉवर चार दिवसांत कार्यान्वित : आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

चिपळूण –
आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येतून ग्रामस्थांना दिलासा
*चिपळूण :* चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील दुर्गम गणेशपूर आणि तिवडी या गावांमध्ये नव्याने उभारण्यात आलेले बीएसएनएलचे मोबाईल टॉवर येत्या चार दिवसांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.या टॉवरमुळे अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.दसपटी परिसरातील गणेशपूर व तिवडी ही गावे दुर्गम भागात असल्याने येथे मोबाईल नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.मोबाईल रेंज नसल्याने नागरिकांना दैनंदिन संपर्क,शासकीय ऑनलाइन सेवा,बँकिंग व्यवहार तसेच आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण,स्पर्धा परीक्षा,अभ्यास साहित्य आणि विविध डिजिटल सेवांचा लाभ घेण्यात अडथळे येत होते.या समस्येबाबत ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे वारंवार पाठपुराव्याची मागणी केली होती.त्यानंतर आमदार निकम यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून गणेशपूर आणि तिवडी येथे मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळवून दिली.आता दोन्ही टॉवरचे काम पूर्ण झाले असून ते येत्या चार दिवसांत कार्यान्वित होणार आहेत.
हे टॉवर सुरू झाल्या नंतर गणेशपूर,तिवडी तसेच परिसरातील अन्य वाड्या-वस्त्यांनाही मोबाईल नेटवर्कचा लाभ मिळणार असून दसपटी विभाग मोठ्या प्रमाणात मोबाईल कव्हरेजमध्ये येणार आहे.त्यामुळे ग्रामस्थ,विद्यार्थी,शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सांगण्यात आले.
या सेवेबद्दल आमदार शेखर निकम यांनी माहीती तंत्रज्ञान मंत्री श्री.आशिष शेलार,त्याचे खासगी सचिव श्री.कुलकर्णी,खासदार श्री.नारायण राणे,खासदार श्री.सुनील तटकरे तसेच बीएसएनएलचे अधिकारी यांचे आभार मानले आहेत.




