पंचनदी येथे कृषिकन्या गटातर्फे शेतकरी सत्कार समारंभ, रानभाज्या प्रदर्शन आणि पाककला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन



(दापोली -प्रतिनिधी: सागर गोवळे.)
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमातील “कृषिकन्या” विद्यार्थीनी गट, पंचनदी यांच्या वतीने मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत, पंचनदी कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये शेतकरी सत्कार समारंभ, रानभाज्यांची पाककला स्पर्धा आणि रानभाज्यांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पंचनदी गावच्या सरपंच सौ. संकल्पा शिंदे व उपसरपंच अमित नाचरे तसेच या गावचे प्रगतशील शेतकरी धनंजय जोशी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी निवडक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि दैनंदिन आहारातील उपयोग याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रानभाज्यांची पाककला स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्थानिक रानभाज्यांपासून विविध पौष्टिक व नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले. तसेच विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शनामध्ये मांडून त्यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.या कार्यक्रमातून शेतकऱ्यांचा सन्मान, स्थानिक रानभाज्यांचे संवर्धन, महिलांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन तसेच स्थानिक उत्पादनांना चालना देण्याचा संदेश देण्यात आला.
उपक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. गुढदे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिकन्या विद्यार्थीनी श्रेया कर्पे, उन्नती धोडी , निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये,समृद्धी आंबेकर,आदिती आंब्रे , श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे,सोनाली खर्चे गटाने विशेष मेहनत घेतली.




