Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील प्रथम ५ अधिकाऱ्यांमध्ये निवड

प्रतिनिधी -शकील गवाणकर
रत्नागिरी :रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विकसित केलेल्या RAIDS ॲपच्या अभिनव संकल्पनेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशातील ‘प्रथम पाच’ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांची निवड झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS ॲपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA), हैदराबाद येथे करण्यात आले. अज्ञात व बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासह बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून अज्ञात व बेवारस मृतदेहांची माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली जाते. मृतदेहांची उपलब्ध छायाचित्रे आणि इतर माहितीच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात येते. मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण असलेल्या प्रकरणांतही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून ओळख पटविण्यास मदत होते.तसेच बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी त्यांच्या चेहऱ्याची तब्बल १०८ विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बेपत्ता व्यक्ती आणि अज्ञात मृतदेहांची ओळख पटविण्याच्या तपास प्रक्रियेला मोठी मदत मिळत आहे.
RAIDS ॲपद्वारे आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी १४ प्रकरणांत मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी ७ प्रकरणांमध्ये RAIDS ॲपच्या सहाय्याने ओळख पटविण्यात यश आले आहे. याशिवाय या ॲपमध्ये एकूण ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात यश आले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या RAIDS ॲपमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशातील ‘प्रथम पाच’ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झालेली त्यांची निवड ही रत्नागिरी पोलीस दलासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!