Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या नेतृत्वात खेर्डीत रंगला दहीहंडीचा थरार : साई प्रतिष्ठानच्या भव्य दहीहंडी महोत्सवात २९ गोविंदा पथकांचा सहभाग : महिला पथकांच्या पाच थरांच्या मनोऱ्याने वेधले लक्ष

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरालगतच्या खेर्डी येथे साई प्रतिष्ठान व साई प्लाझा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कै. उमेश भुरण यांच्या नावाने दहीहंडी उत्सव व स्टेज याला नामांतर देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष, साई प्रतिष्ठानचे आधारस्तंभ तथा यादव चॅरिटी ट्रस्टचे ट्रस्टी नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवाला दहीहंडीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत रंगलेल्या या महोत्सवात चिपळूण, गुहागर, खाडीपट्टा, खेड व लोटे परिसरातील तब्बल २९ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. विविध गोविंदा पथकांनी आकर्षक मनोरे रचत सलामी दिली. सहभागी सर्व पथकांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते महिला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग. तब्बल पाच महिला गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी एका महिला पथकाने पाच थरांचा मनोरा तसेच फिरता मनोरा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिला गोविंदांच्या या उत्साहाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
पुरुष गोविंदा पथकांमध्येही मोठी चुरस पाहायला मिळाली. सहा गोविंदा पथकांनी सात थरांचा मनोरा रचण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मार्कंडी, खेर्डी-शिगवणवाडी, पोकळी, गोवळकोट व गांधारेश्वर येथील पथकांनी उत्तम व मनोरंजनात्मक मनोरे सादर करून वातावरणात रंगत आणली.
अखेरच्या अंतिम फेरीत जय महाकाली गोविंदा पथक पोकळी येथील गोविंदा पथकाने दहीहंडी यशस्वीरित्या फोडून विजेतेपदाचा मान मिळविला. दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. विजेत्या पोफळी गोविंदा पथकाचा आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या हस्ते रोख रक्कम व मानाची गदा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जयंद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, दिशा ताई दशरथ दाभोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य व रत्नागिरी जिल्हा बँक संचालक, पूजाताई निकम विद्यमान जिल्हा परिषद सदस्य , मिलिंद कापडी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक व आधारस्तंभ नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडीबरोबर सामाजिक बांधिलकीची पाच वर्षांची परंपरा जपत नितीन ऊर्फ अबू ठसाळे यांच्या संकल्पनेतून साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सलग पाच वर्षांपासून दहीहंडी उत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. उत्सव हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून प्रतिष्ठानकडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
खेर्डी परिसरासह विविध ठिकाणी वृक्षारोपण करून लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन केले जात आहे. कराड हायवे रोडलगत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची नियमित देखभाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते.
शिक्षण क्षेत्रातही प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जपत खेर्डी मराठी शाळेसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे वह्यांचे वाटप केले आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला मदत केली जाते. तसेच दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले जाते.
महोत्सवातील लकी ड्रॉलाही उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम विजेत्यास फ्रिज, द्वितीय विजेत्यास एलईडी टीव्ही, तृतीय विजेत्यास एअर कूलर फॅन, चतुर्थ विजेत्यास कराओके स्पीकर तर महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पाच पेशवाई साड्या लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आल्या.
दहीहंडीप्रेमींच्या मनोरंजनासाठी लाईट शो, पुणे येथील डीजे स्टार मिस डॉली आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा शो आयोजित करण्यात आला होता. तसेच लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण यांच्या वतीने व दिगंबर सुर्वे व टीमच्या साह्याने वैद्यकीय आरोग्य पथकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदवडे सर आणि गांधी सर यांनी अत्यंत प्रभावी, उत्साही आणि उत्कृष्ट पद्धतीने केले. गोविंदा पथकांच्या सलामीपासून ते विविध मान्यवरांचे स्वागत, बक्षीस वितरण, दहीहंडीच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाची रंगत कायम ठेवली. त्यांच्या दमदार सूत्रसंचालनामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला गुहागर-खेड मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव, चिपळूण मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद भाई चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, चिपळूण पंचायत समितीचे अध्यक्ष सूर्यकांत खेतले, चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन ऊर्फ अबू ठसाळे, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
*“शिस्त • सुरक्षितता • सामाजिक भान • उत्साह • एकजूट”* या पंचसूत्रीचा संदेश देत आयोजित करण्यात आलेला खेर्डीतील बहादुर शेख नाका येथील यंदाचा दहीहंडी महोत्सव दहीहंडीचा थरार, महिला व बाल गोविंदांचा सहभाग, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आणि मनोरंजनाची मेजवानी यामुळे दहीहंडीप्रेमींच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!