Welcome to पूर्णसत्य कोकण   Click to listen highlighted text! Welcome to पूर्णसत्य कोकण
महाराष्ट्र

संगमेश्वर चे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना चैतन्य आर्ट्स चा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

अन्यायाविरुद्ध धडपडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराच्या सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्रीय योगदानाची मोठी दखल

चिपळूण /प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ व निष्कलंक सेवा, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना चिपळूण येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था ‘चैतन्य आर्टस्’ तर्फे या वर्षाचा अत्यंत मानाचा ‘राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. संगीत आणि कला क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत असणाऱ्या ‘चैतन्य आर्टस्’ या संस्थेच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भव्य रंगमंचावर आयोजित ‘आषाढवारी’ या भक्तीसंगीताच्या सुरेल कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ आणि सेक्रेटरी अरविंद जोगले यांनी पत्राद्वारे ही अधिकृत माहिती दिली आहे.

​वयाची साठी ओलांडली तरी अंगातील उत्साह, अन्यायाविरुद्ध चीड आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड जराही कमी झालेली नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सत्यवान विचारे होय. ज्येष्ठ नागरिकत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतरही आजही ते एका तरुण पत्रकाराच्या तळमळीने मैदानावर उतरून तळागाळातील समस्या मांडत असतात. सामान्य जनतेवरील अन्याय दूर व्हावा आणि ग्रामीण भागातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांची लेखणी आजही तितक्याच आक्रमकतेने आणि निष्ठेने चालताना दिसते. त्यांच्या याच अखंड ऊर्जेची आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरीची दखल घेत संस्थेने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे.

​सत्यवान विचारे यांनी १९९७ मध्ये ‘दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस’ मधून अधिकृत आपल्या बातमीदारीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतरच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी दैनिक पुण्यनगरी, कोकण गर्जना, दैनिक सागर आणि श्रीगोंदा सिटीझन अशा नामांकित दैनिकांमध्ये संगमेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. सध्याच्या काळातही ते तितक्याच क्षमतेने दैनिक रत्नागिरी टाईम्स, टाईम्स डिजिटल, दैनिक लोकांकित नवी मुंबई, पनवेल, संगमेश्वर आणि ‘लोक निर्माण’ संगमेश्वर व चिपळूण प्रतिनिधी म्हणून आपली वृत्तपत्रीय सेवा बजावत आहेत.

​केवळ बातमीदारीपुरते मर्यादित न राहता पत्रकारांच्या हक्कासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठे कार्य केले आहे. ‘ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल’ या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेचे ‘राष्ट्रीय खजिनदार’ हे अत्यंत महत्त्वाचे पद ते गेली ११ वर्षे समर्थपणे आणि पारदर्शकतेने सांभाळत आहेत. वाढत्या वयातही अन्यायाला वाचा फोडणारी त्यांची धडपड आणि अडीच दशकांची निष्ठावंत पत्रकारिता यामुळे सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!