मंडणगड तालुक्यातील ख्यातनाम शाहीर विश्वजीत तथा हरिश्चंद्र लोखंडे गुरुजी (तळेघर), कवी गायक मनोहर तांबे (देव्हारे), कवी गायक चिंतामण गमरे (ताम्हाणे) यांची सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने स्वर श्रद्धांजली सभा* *कलावंतांच्या निधनाने बहुजन समाजाचे अतोनात नुकसान : श्री. मंदार कवाडे (अध्यक्ष, सम्यक कोकण कला संस्था)

*मंडणगड* : महाराष्ट्रातील कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ कवी, गायक, लेखक, आदर्श शिक्षक, प्रबोधनकार, तथा कोकणातील लोककला क्षेत्रातील नामवंत शाहीर हरिश्चंद्र उर्फ विश्वजीत लोखंडे गुरुजी (तळेघर – मंडणगड), कवी गायक मनोहर तांबे (देव्हारे), कवी गायक चिंतामण गमरे (ताम्हाणे – मंडणगड) यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. या महान कलावंतांच्या दुःखद निधनाने बहुजन समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या कार्याला गीत गायनातून श्रद्धांजली वाहण्यासाठी कोकण – मुंबईतील कलावंतांची मातृसंस्था असलेल्या प्रख्यात ‘सम्यक कोकण कला संस्था (रजि)’ यांच्या माध्यमातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह मंडणगड येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, संस्थेचे अध्यक्ष श्री. मंदारजी कवाडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्वर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कलावंतांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला मंडणगड तालुक्यातील बहुजन समाजातील सर्व पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, तालुक्यातील सर्व संस्थांनी, महिला मंडळांनी उपस्थित राहून स्मृतीशेष कलावंतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री मंदार दाजी कवाडे ह्यांनी जारी केलेल्या पत्रकात केले आहे. या महान कलावंतांच्या त्यागाचे स्मरण करुन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद तांबे व सचिव नरेश शिंदे ह्यांनी केले आहे.




